Search This Blog

Saturday, August 17, 2024

माणदेशी माणसं 🤎

कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? या प्रश्नाची जी अनेक उत्तरे मला देता येतील त्यातील एक म्हणजे व्यक्तिचित्रे. 
महापुरुषांच्या, थोरामोठ्यांच्या चरित्रातून त्यांच्या उदात्त कार्याविषयी जाणून त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. तर दुसरीकडे व्यक्तीचित्रणं आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या, रोज भेटणाऱ्या नाना तऱ्हेच्या व्यक्तींची पुन्हा नव्याने ओळख करून देतात. वेगवेगळ्या परिस्थितीत जगणाऱ्या, भिन्न स्वभाव वैशिष्ट्ये व जडणघडण असलेल्या माणसांच्या आयुष्यात डोकावताना आपला अनुभव समृद्ध होतोच पण अशी व्यक्तीचित्रणं वाचणे हाच मुळात एक सुखद अनुभव असतो. 
असेच एक सुंदर पुस्तक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर लिखित ' माणदेशी माणसें.' 


सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचे काही भाग मिळून माणदेश तयार झाला आहे. माण नावाची नदी जिथून वाहते तो माणदेश. याच माणदेशातील "माडगूळ" हे लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचं मूळ गाव. 
माडगूळ व परिसरातील इतर गावातून वावरताना भेटलेली काही निवडक माणसं व्यंकटेश माडगूळकरांनी अगदी सहज शैलीत या पुस्तकात साकारलेली आहेत. या सगळ्याच व्यक्तिरेखा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्ती नंतर साधारण १५-२० वर्षांतील आहेत. त्यामुळे ४०-५० च्या दशकातील भारताची सामाजिक - आर्थिक परिस्थिती, स्वातंत्र्य चळवळ, माणदेशातील गरिबी, गांधी वध व परिणामतः निर्माण झालेली परिस्थिती अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी आणि संदर्भ या व्यक्तिचित्रांमध्ये येतात. 

"माणदेशातील गरिबी" हा या पुस्तकातील सर्वच व्यक्तिरेखांना जोडणारे दुवा असला तरी प्रत्येक पानागणिक त्याचा भडिमार केलेला नाही. तर माडगूळकरांच्या सहज शैलीमुळे वाचकाला आपोआप त्याची जाणीव होते. या माणसांचा साधेपणा, नाना तऱ्हेचे स्वभाव, भोवतालची खडतर परिस्थिती आणि त्यातून आकाराला आलेली त्यांची कहाणी - हे सगळं वाचताना आपणही त्यांच्या जगाशी एकरूप होतो आणि त्यांच्या त्या जगातून बाहेर पडतो तेही ही माणदेशी माणसं कुठेतरी आपल्यालाही भेटली आहेत अशी जाणीव घेऊनच! 

©️- अदिती कुलकर्णी. ✍🏻

No comments:

Post a Comment

खारेपाटण येथील पुरातन किल्ला

#सफर_ तळकोकणच्या_इतिहासाची  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार समजले जाणारे खारेपाटण, आजच्या मुंबई - गोवा महामार्गालगत वसलेले एक श...