नाव होतं - अरुप कुमार दत्ता लिखित "आसामचा धाडसी योद्धा लाचित बरफुकन"
लाचित बरफुकन यांच्याबद्दल काही लेखात तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. निनादराव बेडेकर यांच्या एका व्याख्यानातही ऐकले होते. परंतु पुढे त्यावर काही फारसं वाचन झालं नव्हतं. तीच संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली.
ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर तीरावर गुवाहाटी जवळ मुघलांशी केलेल्या - सराईघाटच्या युद्धामुळे व त्यात मुघलांचा जो निर्णायक पराभव झाला त्यामुळे लाचित हे आसामी इतिहासात अजरामर झाले आहेत. 'आसामचा शिवाजी' अशा पदवीनेही त्यांना ओळखले जाते. तसे बघायला गेले तर, लाचित बरफुकन हे महाराजांच्या समकालीन आणि दोघांचा शत्रूही एकच - आलमगीर औरंगजेब !
याच आसामी योद्ध्याची ओळख करून देणारे हे पुस्तक. आसामच्या अहोम घराण्याचा थोडक्यात परिचय, आसाममधील प्रशासकीय-सामाजिक-राजकीय-सैनिकी व्यवस्था, 'बरफुकन' म्हणजे काय?, अहोम(आसामी) - मुघल संघर्षाची पार्श्वभूमी अशा अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. अर्थात हे पुस्तक सखोल नाही. 'विषय प्रवेशा' च्या दृष्टीने वाचावे. असे असले तरी आसाम बुरुंजी, सुर्यकुमार भुयान यांनी केलेले विस्तृत लेखन याचा आधार घेऊन हे पुस्तक साकार झाले आहे.
आसाम राज्य शासनाने या पुस्तकाचे प्रकाशन करून, भरतभूमीच्या या वीरपुत्राची कहाणी भारताच्या इतर भागातही पोहचावी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ती वाचावी यासाठी मूळ इंग्रजी पुस्तकाचे भारताच्या संविधानात परिशिष्ट ८ मध्ये उल्लेखलेल्या सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर केलेले आहे.
शक्यतो पुस्तक वाचताना त्याची मूळ भाषा येत असल्यास पुस्तक त्यातच वाचावे, असे मला वाटते. पण हे पुस्तक मला मूळ इंग्रजीत नाही तर मराठीत उपलब्ध झाले. पुस्तकातील युद्धाची, एकमेकांतील पत्रव्यवहाराची वर्णने चांगली असली, तरी काही ठिकाणी भाषेत उगाचच क्लिष्टता आली आहे.
एकंदर, लाचित बरफुकन यांचे कार्य, मुघलांशी लढताना आसामी लोकांनी दाखवलेले धैर्य, ब्रह्मपुत्रा व आसामच्या भूगोलाचा केलेला वापर, नानाविध क्लृप्त्या, त्यामुळे मुघलांची झालेली दयनीय स्थिती या सगळ्याचा परिचय करून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा!
एकीकडे कृष्णा- गोदावरीच्या खोर्यात, मुघल साम्राज्याची कबर खोदली जात असतानाच, त्याच मुघल सामर्थ्याला ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात सळो की पळो करून सोडणाऱ्या आसामी वीरांची गाथा नक्कीच वाचनीय आहे !!
©️ - अदिती कुलकर्णी. ✍️🏻

No comments:
Post a Comment