Friday, July 5, 2024

भारत मार्ग - डॉ. एस. जयशंकर

''जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे' हे वाक्य आपण सगळ्यांनी असंख्य वेळा ऐकले असेल. 'जग जवळ आले आहे' याचा सरळ सरळ अर्थ असा की, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर पडतात. मग ती कोविड सारखी वैश्विक घटना असेल, युक्रेन संघर्ष असेल किंवा आणखी काही. 
मात्र अशा घटनांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर कसा व कितपत परिणाम होतो हे मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या इतर देशांशी असलेल्या संबंधांवर म्हणजेच देशाच्या परराष्ट्र धोरणावर अवलंबून असते. 


हे परराष्ट्र धोरण खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल, सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात आपल्या देशाची नीती काय आहे, देशाच्या सर्वोच्च शासनाची त्याबाबतची भूमिका काय आहे हे सगळं जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी एक अतिशय उपयुक्त पुस्तक म्हणजे भारताचे विद्यमान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे The India Way. 
भारत मार्ग हा त्याच बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद. सरिता आठवले यांनी हा अनुवाद केलेला असून भारतीय विचार साधना पुणे यांनी हे पुस्तक मराठीत प्रकाशित केले आहे. 

आपले परराष्ट्र धोरण अनेक घटकांच्या संमिश्रणातून आकाराला आले आहे. तसेच जागतिक राजकारणाला प्रभावित करणाऱ्या काही प्रमुख शक्ती, जसे की अमेरिका, पाश्चिमात्य देश, चीन, जपान, गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे इंडो - पॅसिफिक ( भारतीय - प्रशांत महासागर ) क्षेत्र या सगळ्यांशी असलेले आपले संबंध हे विस्तृत व गुंतागुंतीचे आहेत. या प्रत्येक घटकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यातील काही महत्वाचे टप्पे (milestones) तसेच सद्यस्थितीतील वाटचालीची दिशा याबाबत डॉ. जयशंकर यांनी सुटसुटीत शैलीत विवेचन केले आहे. सुटसुटीत हा शब्द मुद्दाम वापरावासा वाटतो ते यासाठी की वरील उल्लेखित प्रत्येक घटक हा एकमेकांशी केवळ संलग्न नव्हे तर एकमेकांत गुंफलेला आहे. परंतु तरीही पुस्तकाच्या मांडणीमुळे एकेका घटकाविषयी स्वतंत्रपणे वाचता येते. किंबहुना त्यामुळे अनेक अपरिचित गोष्टी प्रथमतः वाचताना सुद्धा क्लिष्ट / कंटाळवाण्या वाटत नाहीत. 

त्यापैकी ' कृष्णाची निवड - उदीयमान शक्तीची धोरण संस्कृती ' हे प्रकरण म्हणजे तर जणू या पुस्तकाचा high point आहे. सध्याच्या अनिश्चित आंतरराष्ट्रीय परिस्थितीत जागतिक पातळीवर एक सामर्थ्यवान देश म्हणून उदयास येताना केवळ दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल न ठेवता आपण नवे पायंडे पाडत आहोत, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करीत आहोत. या प्रक्रियेत आपल्याला दिशा दर्शन करू शकेल असा प्रभावी घटक म्हणजे महाभारत - अर्थात आपला इतिहास! 
आणि जागतिक राजकारणाकडे बघण्याचा हाच वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन म्हणजे डॉ. जयशंकर यांनी नमूद केलेला भारत मार्ग! 

©️ - अदिती कुलकर्णी. ✍🏻

No comments:

Post a Comment

माणदेशी माणसं 🤎

कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? या प्रश्नाची जी अनेक उत्तरे मला देता येतील त्यातील एक म्हणजे व्यक्तिचित्रे.  महापुरुषांच्या, थोरामो...