Wednesday, July 27, 2022

श्री शंभूछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार - जुवे किल्ला

छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द ही अवघ्या नऊ वर्षांची ! परंतु ही नऊ वर्ष अतुल्य शौर्याने नटलेली आहेत. त्यातील एक सुवर्ण पान आहे पोर्तुगीजांच्या विरुद्ध केलेल्या मोहिमेचे. 
ही मोहीम भौगोलिकदृष्ट्या जरी बऱ्याच मोठ्या प्रदेशात पार पडली असली तरी त्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे गोव्यातील जुवे किल्ला उर्फ फोर्ट सेंट इस्तेवांम ( saint estevam ). 
हा किल्ला मांडवी नदीतील बेटांपैकी आकाराने सर्वांत लहान असलेल्या जुवे बेटावर वसलेला आहे. बेटावर जेट्टीने तसेच गाडी रस्त्याने देखील जाता येते. किल्ला अगदीच लहान आहे. किल्ल्याच्या आवारात एक शापेल आणि एक खोली सोडल्यास दुसरे काही नाही. किल्ल्यावर जाण्याचा रस्ता चढणीचा आणि खराब आहे. 

किल्ल्याचा इतिहास : 
पोर्तुगीजांनी जेव्हा मराठ्यांच्या विरुद्ध मुघलांना मदत केली तेव्हा त्यांना अद्दल घडवण्यासाठी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या चौल व उत्तरेकडील इतर भागांवर स्वारी केली. संभाजी महाराजांनी चौलला घातलेला वेढा ढिला पडावा म्हणून पोर्तुगीजांनी गोव्यातील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला. पण तसे काही न घडता; पोर्तुगीजांच्या हातून उत्तरेकडील प्रदेश तर गेलाच, फोंड्याला देखील त्यांचा जबरदस्त पराभव झाला. 
पण  संभाजी महाराज तेवढ्यावर न थांबता त्यांनी लगोलग २४ नोव्हेंबर १६८३ ला जुव्याचा कोट जिंकून घेतला. ही पोर्तुगीजांसाठी धोक्याची घंटा होती - कारण या जूवे बेटावरून गोव्यात थेट प्रवेश करता येत असे. म्हणून व्हाईसरॉय सैन्यानिशी बेटावर चालून गेला. मराठ्यांनी त्याला बेटावर येऊ दिले आणि मग त्यावर तिखट हल्ला चढवला. छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या सैन्याचा तो आवेश पाहून व्हाइसरॉयने धूम ठोकली. यापूर्वी पोर्तुगीजांची इतकी नामुष्की कधीच झाली नव्हती. संभाजी महाराजांच्या या मोहिमेमुळे पोर्तुगीजांना त्यांची जबरदस्त दहशत बसली. म्हणूनच ही गोवा मोहीम आणि जुव्याचा किल्ला संभाजी महाराजांच्या इतिहासात अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 


No comments:

Post a Comment

माणदेशी माणसं 🤎

कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? या प्रश्नाची जी अनेक उत्तरे मला देता येतील त्यातील एक म्हणजे व्यक्तिचित्रे.  महापुरुषांच्या, थोरामो...